Marathwada Sathi

‘हॅलो… पोलिस, मी शाहरुख खान बोलतोय!

मराठवाडा साथी
नागपूर : ‘हॅलो… पोलिस, मी शाहरुख खान बोलतोय… अधिकारी आहे का?’ समोरच्या पोलिसाने अधिकाऱ्याला फोन देताच शाहरूख एखाद्या ‘डॉन’प्रमाणे पोलिसांना चक्क शिवीगाळ करतो. शाहरुखच्या या कारनाम्यामुळे पोलिसांना ‘डर’ बसला आहे. पोलिस कारवाईचा ‘अंजाम’ त्याला माहिती नाही. पोलिसांच्या खाक्या बसताच या तोतया शाहरुखची परिस्थिती ‘कल हो ना हो’ सारखी होईल, एवढे निश्चित.शुभम नावाचा युवक तेलंगखेडी भागात राहातो. तो शाहरुख खानचा जबरा फॅन आहे, तर पोलिसांचा कट्टर दुश्मन. काही महिन्यांपूर्वी त्याला पोलिसांचा ‘बाजीराव’ पडला. तेव्हापासून त्याने पोलिसांना त्रास देणे सुरू केले. ‘बाजीगर’ असल्याच्या तोऱ्यात तो अंबाझरी, सीताबर्डी, लकडगंज, पोलिस नियंत्रण कक्षासह शहरातील अनेक पोलिस स्टेशमध्ये फोन करतो. ‘मी शाहरुख खान बोलतो,’असे सांगतो. सुरुवातीला स्टेशन डायरीवर तैनात अधिकारी बुचकळ्यातच पडले. ‘खरंच शाहरूख खानने फोन केला?’ असा त्यांचा समजही झाला. मात्र, समोरून बोलणारा हा शुभम ऊर्फ शाहरूख खान सुरुवातीच्या तीन मिनिटे पोलिसांना शिवीगाळ करतो. त्यानंतर तो ओळखीच्या प्रतिष्ठित नागरिकाला कॉन्फरन्सवर जोडतो. हे मात्र पोलिसांना माहिती नसते. तीन मिनिटानंतर पोलिसही त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देतात. यावेळी हा शाहरूख पोलिस कशा प्रकारे छळ करतात, याचा गवगवा प्रतिष्ठित नागरिकासमोर करतो. त्याचा हा सिलसिला अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

Exit mobile version