Marathwada Sathi

शेतकरी आंदोलनात बच्चू कडू यांची उडी, हजारो शेतकऱ्यांसोबत दिल्लीकडे कूच करणार…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांचे न ऐकायला ते काय पाकिस्तानातून आलेत का?’, असा रोखठोक सवाल अण्णा हजारे यांनी सरकारला विचारला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या या आंदोलनात प्रहारचे बच्चू कडू यांनीही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावे व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. तीन दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार आहे, असा इशारा बच्चु कडू यांनी सरकारला केला आहे. त्यांनी याबाबत आपल्या सोशल अकाउंटवर माहिती शेर केली आहे.

कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणातील शेतकरी ‘दिल्ली चलो’ आंदोलनात सहभागी झाले आहेत. दिल्लीच्या सिंधु सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावालाही शेतकऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी संघटनांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र शहा यांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर असलेल्या निरंकारी समागम मैदानावर जाण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे. 

Exit mobile version