Home Uncategorized खा.संजय राऊतांकडून देवेंद्र फडणविसांचे कौतूक!

खा.संजय राऊतांकडून देवेंद्र फडणविसांचे कौतूक!

8
0

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षाने सरकारविरोधात घेतलेली भूमिका लोकशाहीत बसत नाही अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.

“देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून आम्ही कायम त्यांचा सन्मान केला. ते तरुण आहेत, त्यांचा अनुभव वाढत जाणार आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही.ध्यानीमनी नसताना ते मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

“उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये चांगला संवाद आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये चांगला संवाद असायला हवा. पण अनेकदा ही श्रृंखला तुटताना दिसत आहे. विरोधी पक्षाने आपलं महत्व ओळखायला हवं. आम्ही १०५ असून समांतर सरकार चालवत आहोत असा विचार त्यांनी केला पाहिजे. सत्ता गेली म्हणून राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“हे सरकार होणारच होतं. हे सरकार होणार नाही असं काही लोकांना वाटत होतं, पण माझ्यासारख्या काही लोकांना सरकार अशा प्रकारे घडेल असं वाटत होतं त्यानुसार झालं. हे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशाही काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. पण सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार पूर्ण ताकदीने चाललं आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

राज्य सरकारसमोर अनेक आव्हानं आहेत. आव्हान निर्माण करणं विरोधकांचा अजेंडा आहे. ती आव्हानं आपण राज्यासमोर निर्माण करत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. चांगल्या विरोधकांचं स्वागत करावं या मताचा मी आहे. विरोधी पक्ष राहूच नये असं केंद्रातील सरकारला वाटतं. लोकशाहीत उत्तम विरोधी असायला हवेत, त्याशिवाय राज्य पुढे जात नाही. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. पण सध्या दुर्दैवाने आपल्या विचाराचे नाहीत त्यांना राजकारण, समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका तयार होताना दिसत असून घातक आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. “मोफत करोना लस देण्याच्या लोकप्रिय घोषणा दिल्यानंतर निवडणूक आयोग त्यावर आक्षेप घेत नाही. यावरून निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे असं माझं स्पष्ट आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

काय म्हणाले संजय राऊत?

राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. त्यांनी बाहेर राजकारण करावे, आम्ही दाखवून देऊ,” असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे. “शरद पवार हे प्रेम करणार व्यक्तिमत्व आहे. शरद पवार हे लोकनेते आहेत. मागील कित्येक वर्षात लोकांमध्ये जाणारा नेता मी पाहिलेला नाही,” असं कौतुक संजय राऊत यांनी केलं. “हे सरकार पडणार नाही आणि त्यांच्यातील बोलणंदेखील बंद झालं नाही. उर्वरित चार वर्ष सरकार पूर्ण करेल,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here